मुंबई, 25 जून 2025 : महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील “मुलाखतीसह” पदभरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या टप्प्यांतर्गत विविध शैक्षणिक गटांमधील एकूण 8556 रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांनुसार शिफारस करण्यात आली आहे.
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रगती
2022 साली घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे, पहिल्या टप्प्यात 21,678 पदांवर तर दुसऱ्या टप्प्यात “मुलाखतीशिवाय” भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उर्वरित दुसऱ्या टप्प्यात “मुलाखतीसह” पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे.
30 गुणांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी
शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 नुसार, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी ही प्रक्रिया संस्थांच्या स्वविवेकावर अवलंबून होती, मात्र आता एकसमान व पारदर्शक मूल्यांकनासाठी SOP (Standard Operating Procedure) निश्चित करण्यात आलेली आहे.
गुणवत्ता यादीचा तपशील
- एकूण 1861 व्यवस्थापनांमधील 8556 पदे उपलब्ध.
- 12966 उमेदवारांची निवड व 71802 प्राधान्यक्रमांवर शिफारस.
- 81 व्यवस्थापनांनी जाहिरात रद्द केल्यामुळे 177 पदे भरली जाणार नाहीत.
यादीतील नाव चेक करण्यासाठी लिंक –
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/
उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार कार्यवाही
गुणवत्ता यादी ही मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
उमेदवारांसाठी सूचना
- शिफारस झालेल्या उमेदवारांनी संबंधित शाळेशी तात्काळ संपर्क साधावा.
- निवड प्रक्रियेबाबत शाळांना सविस्तर सूचना पोर्टलवर दिल्या आहेत.
- निवड प्रक्रियेत कोणताही गैरमार्ग टाळावा.
तक्रार निवारणासाठी व्यवस्था
निवडीबाबत तक्रार असल्यास उमेदवारांनी pavitra2022grcc@gmail.com या अधिकृत ई-मेलवर दहा दिवसांच्या आत विहित नमुन्यात व सबळ पुराव्यांसह अर्ज करावा.
- ई-मेल फक्त उमेदवारांकडूनच स्वीकारले जातील.
- गट ई-मेल, संस्थात्मक तक्रारी किंवा अन्य माध्यमातून आलेल्या तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
- मुदतीनंतर पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
शासनाकडून शुभेच्छा
शालेय शिक्षण विभागातर्फे सर्व शिफारस झालेल्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
स्रोत : शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन