शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल – १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण


पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. १८) जाहीर झाला. मात्र, या निकालात गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याचे प्रकरण उघड झाल्याने विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत असून, परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी मांडल्या. काही विद्यार्थ्यांना २०२२ च्या परीक्षेत जितके गुण मिळाले होते, तितकेच गुण या वर्षीही मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर, एका विद्यार्थ्यास मागील परीक्षेत केवळ ४२ गुण मिळाले होते, परंतु यंदाच्या निकालात त्याच विद्यार्थ्यास १४८ गुण मिळाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांचे गुण अचानक मोठ्या प्रमाणात घटले आहेत. त्यामुळे या निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

परीक्षेच्या निकालाबाबत आधीच वादंग होते. परीक्षा पूर्ण होऊन जवळपास अडीच महिने उलटून गेले तरी निकाल प्रसिद्ध करण्यात आला नव्हता. विद्यार्थ्यांकडून वारंवार निकाल लावण्याची मागणी होत होती. अखेर तीन महिन्यांनंतर निकाल जाहीर झाला, मात्र त्यातच गंभीर घोळ झाल्याचे आता स्पष्ट होत आहे.

विद्यार्थ्यांनी निकालाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेकडून या वादाबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

१८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आधीच निकाल लावण्यात झालेला विलंब आणि आता अचानक १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण लागल्याने विद्यार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, पुण्यातील शुभदा बागूल या विद्यार्थिनीनं परीक्षेत तब्बल १९९ प्रश्न सोडवले होते. तरीही निकालात त्यांना शून्य गुण मिळाले आहेत. २०२२ च्या टेट परीक्षेत त्यांना १०३ गुण मिळाले होते. अधिक अभ्यास करून, आत्मविश्वासाने दिलेल्या या परीक्षेत शून्य गुण कसे मिळू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, अन्य विद्यार्थ्यांनीही निकालाबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. परीक्षार्थी सुमित सातपुते, सुहासिनी ढापरे यांनी निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रूपेश्री नागणे यांचे अनुभवही याच धर्तीवर आहेत. त्यांच्या मते, मागील परीक्षा अवघड असतानाही १०३ गुण मिळाले होते, परंतु यंदाची परीक्षा तुलनेने सोपी असूनही निकालात तेवढेच गुण लागले आहेत.

विद्यार्थ्यांनी पुरावे हाती लागत असल्याचे सांगत, या प्रकरणाची लवकरच कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे. या निकालातील विसंगतीमुळे भावी शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी परीक्षा विभागाच्या आयुक्त डॉ. अनुराधा ओक आणि शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळू शकला नाही. परिणामी निकालातील गोंधळ आणखी गडद होत चालला आहे.

Leave a Comment