पुणे – शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत प्रसिध्दीपत्रक जारी करताना उमेदवारांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा इशारा दिला आहे.
TAIT 2025 परीक्षेचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि IBPS या संस्थेमार्फत ही परीक्षा २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ तसेच २ जून २०२५ ते ५ जून २०२५ दरम्यान राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. एकूण ८ दिवस चाललेल्या या परीक्षेत प्रतिदिन तीन सत्रे झाली. २२८८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २११३०८ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसले.
निकाल जाहीर करण्यात उशीराचे कारण
शासन शुध्दीपत्रक दिनांक २ मे २०२५ नुसार, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हतेचे (बी.एड./डी.एल.एड.) प्रमाणपत्र निकालानंतर १ महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक होते. मात्र, विविध संस्थांचे निकाल वेगवेगळ्या तारखांना जाहीर झाल्यामुळे सर्व माहिती एकत्र करण्यास वेळ लागत आहे. विशेष म्हणजे, डी.एल.एड. परीक्षेचा निकाल नुकताच ५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाला आहे.
परीक्षार्थ्यांसाठी महत्वाचा सल्ला
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की निकालाच्या कार्यवाहीला अंतिम टप्पा आला आहे आणि तो लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल. उमेदवारांनी कोणत्याही युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया पोस्ट्स किंवा इतर स्रोतांवरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवरील अद्यतनेच पाहावीत. अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार असतील.
अधिकृत वेबसाइट: www.mscepune.in