पुणे – राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये सरळसेवा आणि पोलीस भरतीच्या तारखांबाबत अनिश्चितता कायम आहे. राज्य शासनाच्या अनेक विभागांतील हजारो पदे रिक्त असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यार्थी समन्वय समितीने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि पोलीस भरतीसाठी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली. समितीचे अध्यक्ष विठ्ठल बडे यांनी सांगितले की, “केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि केरळ-तमिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातही दरवर्षी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले पाहिजे. यामुळे उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करता येईल आणि प्रक्रियेत पारदर्शकता राहील.”
राज्यातील सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांना या धोरणाचा फटका बसत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी, पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती जाहीर करत १५ सप्टेंबर रोजी मैदानी चाचणी होईल, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत प्रक्रिया सुरू झालेली नाही.
भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासन निर्णय, अर्ज प्रक्रिया, अर्ज छाननी आणि परीक्षा घेण्यासाठी आवश्यक वेळ लक्षात घेता, सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे विद्यार्थी संघटनांचे मत आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे आश्वासन पुन्हा एकदा हवेत विरण्याची शक्यता आहे.
समितीने शासनाला तातडीने वेळापत्रक जाहीर करून भरती प्रक्रिया पारदर्शक व वेळेवर राबविण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा राज्यभरातील उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.