साताऱ्यात शिक्षण सेविकेने खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरती मडोळे या लातूर जिल्ह्यातील निबुलगा (ता. निलंगा) येथील रहिवासी असून, त्यांनी ओबीसी प्रवर्ग आणि भूकंपप्रवण क्षेत्राचा लाभ घेत सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागात ९ ऑगस्ट २०१९ रोजी मुलाखतीशिवाय भरती मिळवली होती. त्यानंतर त्यांना भोसरे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून नेमणूक करण्यात आली.

गटशिक्षणाधिकारींच्या अहवालानुसार, आरती मडोळे यांना शिक्षण सेवक साठी पात्रता परीक्षेत २०० पैकी १०६ गुण मिळाले होते, तर CTET मध्ये १५० पैकी ७३ गुण होते. तथापि, शिक्षक पदासाठी लागणाऱ्या पात्रतेनुसार खुल्या प्रवर्गासाठी किमान ६०% आणि ओबीसीसाठी ५५% गुण आवश्यक असताना, त्यांचे एकूण गुण फक्त ४८.६६% होते.

त्यामुळे त्या पात्रतेचे निकष पूर्ण नव्हते असे असतानाही त्यांनी स्वयं प्रमाणपत्राद्वारे खोटी माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण सेवक पदाच्या कालावधीनंतर जेव्हा कायमस्वरूपी नेमणुकीसाठी मूळ कागदपत्रे सादर करावयाची होती, तेव्हा त्या वारंवार टाळाटाळ करत होत्या.

गटशिक्षणाधिकारी विभूते यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासंबंधी तक्रार दाखल केली, त्यानुसार वडूज पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि सरकारी सेवेत अपात्र व्यक्तीची नियुक्ती अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि गुणवत्ता याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा फसवणुकीच्या प्रकारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

1 thought on “साताऱ्यात शिक्षण सेविकेने खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल”

Leave a Comment