मुंबई महापालिकेची 1,846 लिपिक पदांसाठी परीक्षा 2 ते 12 डिसेंबर दरम्यान

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या विविध खात्यांमधील 1,846 रिक्त पदांसाठी 2 ते 6 डिसेंबर आणि 11 व 12 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे महापालिकेच्या कामकाजावर होणारा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर (www.mcgm.gov.in) प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून उमेदवारांना ती डाऊनलोड करून घ्यावी लागणार आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या देखरेखीखाली ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना वेळापत्रकानुसार आपल्या केंद्रांवर वेळेत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट ते 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑनलाईन स्वरूपात राबवण्यात आली होती. उमेदवारांना लॉगिन करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल, ज्यावर परीक्षेसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या सूचना नमूद असतील. परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी 95132 53233 हा मदत क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रिक्त लिपिक पदांमुळे महापालिकेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने ही भरती प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. नवीन उमेदवार महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्यास दैनंदिन कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment