वसई :पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागात निसर्गाचा वरदहस्त लाभतो, आणि वसईच्या शेतमजुरांसाठी हा ऋतू रोजगाराची संधी घेऊन येतो. पावसामुळे उगवणाऱ्या भरघोस हिरव्या गवतामुळे शेतमजुरांना चारा विक्रीतून हंगामी उत्पन्न मिळू लागले आहे.
भात लागवडीचे काम आटोपल्यानंतर शेतमजूर आपल्या उदरनिर्वाहासाठी शेताच्या बांधावर, रानावर उगवणारे गवत कापून त्याचे भारे तयार करतात. या भाऱ्यांची विक्री करून दिवसाला ४०० ते ५०० किलो चारा विकला जातो. यासाठी मजुरांना प्रति किलो १ ते २ रुपये इतका दर मिळतो. चार महिन्यांच्या या हंगामात एका मजुराला सरासरी २५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
या चाऱ्याला वसई-विरारसह मुंबई, ठाणे आणि पालघरमधील दुग्ध व्यवसायिकांकडून मोठी मागणी असते. व्यापारी दररोज ठरावीक ठिकाणी ट्रक उभा करून चाऱ्याची खरेदी करतात. त्यामुळे मजुरांनी कापलेला चारा सहज विकला जातो.
शेतमजूर बबन ठाकूर सांगतात, “भात लावणीनंतर फारसे काम राहत नाही, पण हा चारा कापून विकल्याने संसाराला चांगला हातभार लागतो. दररोज थोडा मेहनत घेतल्यास महिन्याला हजारोंची कमाई होते.”
हा चारा गुरांना पोषणमूल्यांनी भरलेला असल्याने दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे दुग्धव्यवसायिक चाऱ्यासाठी अधिक पैसे देण्यासही तयार असतात. काही व्यापारी तर मजुरांकडून थेट चारा साठवून ठेवण्याचे आगाऊ करारही करतात.
या छोट्याशा उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या हाताला काम मिळते, व निसर्गाचा योग्य वापर करून स्थानिक स्तरावर उत्पन्नाची नवी वाट मिळते. चाऱ्याची ही हंगामी विक्री शेती कामांतील अर्धवट रिकाम्या काळाचा उत्कृष्ट वापर करत आहे, आणि शेतमजुरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे.