ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी आणि बचत गटांच्या उत्पादनांना स्थिर आणि प्रभावी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ही योजना ग्रामीण भागातील स्वयं-सहाय्यता गटांच्या (Self Help Groups – SHGs) महिलांना त्यांच्या विविध उत्पादने, जसे की – अन्नप्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, हस्तकला, सेंद्रिय उत्पादने यांना स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पहिल्या टप्प्यात १० जिल्हे
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १० निवडक जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारले जाणार असून, यानंतर टप्प्याटप्प्याने ही योजना राज्यातील इतर जिल्ह्यांतही विस्तारली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील केंद्रासाठी कमाल २० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या जमिनीवर होणार उभारणी
हे मॉल जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जमिनीवर उभारले जाणार असून, यामध्ये चक्राकार पद्धतीने प्रत्येक बचत गटाला स्वतंत्र गाळा दिला जाणार आहे. तसेच संवाद प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सभागृहाची सुविधाही या मॉलमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे महिलांना विपणन कौशल्य, संवाद क्षमता आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल.
प्रस्ताव आणि अंमलबजावणी
या केंद्रांसाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवले जातील. संपूर्ण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली केली जाणार आहे. यामध्ये निविदा प्रक्रिया, आराखड्यांची आखणी आणि प्रत्यक्ष बांधकाम हे टप्पे समाविष्ट असतील.
दीर्घकालीन देखभाल
‘उमेद मॉल’ची देखभाल व दुरुस्ती ही जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे, जेणेकरून ही केंद्रे दीर्घकाळ कार्यरत राहतील व लाभार्थींना सातत्याने लाभ देता येईल.
ग्रामीण महिलांसाठी नवा अध्याय
या निर्णयामुळे ग्रामीण महिलांना केवळ उत्पन्नाचे साधन मिळणार नाही, तर त्यांची आर्थिक स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता वाढीस लागणार आहे. ‘उमेद मॉल’ ही संकल्पना महिलांच्या उत्पादनक्षमतेला आणि सृजनशक्तीला एक भक्कम व्यासपीठ देणारी आहे, जी भविष्यात महाराष्ट्रातील महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात एक महत्त्वाची क्रांती घडवू शकते.