नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने मध्यम ते कनिष्ठ स्तरातील सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०२५ पासून वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सी३ए आणि त्यासमकक्ष श्रेणीतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा या वेतनवाढीमध्ये समावेश होणार असून, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ईमेल सूचनांद्वारे कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देत टीसीएसने त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तथापि, या आनंददायी बातमीसोबतच एक गंभीर बाबही समोर आली आहे. कंपनीने आपल्या २ टक्के मनुष्यबळावर म्हणजेच सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांवर कपातीचा निर्णय कायम ठेवला आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे टीसीएसने स्पष्ट केले आहे.
कंपनी सध्या कृत्रिम प्रज्ञा (AI) आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश, ग्राहकसेवा सुधारणा आणि पुढील पिढीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे. तसेच, एआयचा अंतर्गत कामकाजात वाढता वापर हा देखील कंपनीच्या धोरणाचा भाग आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत, भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत फक्त एक अंकी महसूली वाढ नोंदवली आहे. जागतिक आर्थिक अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे ग्राहकांकडून प्रकल्पांवरील निर्णयात विलंब होत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतेत आहे.