आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. चुकीचे आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हार्ट अटॅकचा धोका निर्माण झाला आहे. साध्या हार्ट अटॅकबद्दल आपण ऐकलेले असते, परंतु सायलेंट हार्ट अटॅक (Silent Heart Attack) हा अधिक घातक प्रकार आहे. कारण या हार्ट अटॅकमध्ये ठळक लक्षणं जाणवत नाहीत आणि अनेकांना महिन्यांनंतर तपासणीत समजते की त्यांना हार्ट अटॅक झाला होता.
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये देखील हृदयाला रक्त व ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो, पण यात छातीत तीव्र वेदना जाणवत नाहीत. त्याऐवजी हलकासा स्नायू दुखणे, अपचनासारखा त्रास, सतत थकवा जाणवणे किंवा अंगात अशक्तपणा ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे लोक ही लक्षणं दुर्लक्ष करतात आणि धोका वाढतो.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं
- सतत थकवा जाणवणे
- पोटात किंवा छातीत जळजळ, अपचनासारखा त्रास
- स्नायू दुखणे किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटणे
- जबड्यात, पाठीवर किंवा हातात हलकासा त्रास
- सततचा अशक्तपणा
ही लक्षणं साध्या आजारांशी जोडली जातात, पण प्रत्यक्षात ती सायलेंट हार्ट अटॅकची सुरुवात असू शकते.
नॉर्मल हार्ट अटॅकची लक्षणं
- छातीत तीव्र वेदना
- श्वास घेण्यास त्रास
- चक्कर येणे
- थंड घाम येणे
- मळमळ किंवा उलट्या होणे
धोका कोणाला जास्त?
- मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना
- जाड किंवा जास्त वजन असणाऱ्यांना
- धूम्रपान करणाऱ्यांना
- व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव असणाऱ्यांना
- ४५ वर्षांवरील पुरुष व रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना
- कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास
बचाव कसा करावा?
- नियमित आरोग्य तपासणी करणे
- संतुलित आहार घेणे
- रोज किमान ३० मिनिटे व्यायाम
- ताण कमी ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे
- धूम्रपान व मद्यपान टाळणे
सायलेंट हार्ट अटॅक हा “अदृश्य शत्रू” आहे. योग्य वेळी लक्ष दिल्यास हृदयाचे आरोग्य जपता येते आणि जीवघेणा धोका टाळता येतो.