सांगली जिल्ह्यात शाळांना दोन दिवस सुट्टी; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश


सांगली : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ, कोयना व वारणा धरणातील विसर्ग आणि सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे (भा.प्र.से.) यांनी आज (दि. 19 ऑगस्ट 2025) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलमान्वये हा आदेश जारी केला.

सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुके तसेच सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळांना दि. 20 ऑगस्ट व 21 ऑगस्ट 2025 या दोन दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या कृष्णा नदीची पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता व नागरिकांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शाळांची इमारत व खोल्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तथापि, या सुट्टीच्या काळात सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत तातडीने अंमलात आणला जाणार आहे.

Leave a Comment