रत्नागिरी: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील दीर्घकाळ रिक्त असलेल्या पदांची भरती अखेर सुरू झाली आहे. शासनाने या भरतीला मान्यता दिली असून, एकूण २७१ पदे भरण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
या भरतीत महाविद्यालयातील २५ तर जिल्हा रुग्णालयातील २४६ पदांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. यामुळे रत्नागिरी तसेच कोकणातील स्थानिक युवकांना आपल्या जिल्ह्यातच रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून १४० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत होता. उपचार व्यवस्थेत अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र होते. दै. पुढारीने या समस्येवर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेतली आणि भरती प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
या भरतीमुळे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील सेवा अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक युवकांना रोजगारासह आरोग्य व्यवस्थेला आवश्यक पाठबळ मिळणार असल्याने जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक परिणामकारक होण्याची शक्यता आहे.