रायगड जिल्ह्यात २० ऑगस्ट सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश


रायगड : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी २० ऑगस्ट २०२५ रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या (२० ऑगस्ट) एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे की, आज दिवसभर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी इशारापातळी ओलांडली आहे. कुंडलिका, अंबा व सावित्री नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भागात पाणी शिरले आहे. तसेच समुद्रातील भरतीमुळे किनारी भागातही धोका वाढला आहे.

या परिस्थितीचा आढावा घेत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या अहवालांच्या आधारे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, सरकारी व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

तथापि, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहकार्य करावे.

या आदेशाची अंमलबजावणी २० ऑगस्ट २०२५ रोजी तात्काळ करण्यात येणार आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment