पुणे:
समाजात अजूनही मुलगा जन्माला आला की आनंद साजरा होतो, पण मुलगी झाली तर तोच आनंद अनेकदा दिसत नाही. मात्र, या मानसिकतेला बदलण्यासाठी पुण्याचे प्रसिद्ध डॉक्टर गणेश राख गेल्या अनेक वर्षांपासून एका अनोख्या उपक्रमातून काम करत आहेत. त्यांच्या या कार्याने उद्योजक आनंद महिंद्राही भारावून गेले असून त्यांनी सोशल मीडियावर डॉ. राख यांचे कौतुक केले आहे.
डॉ. गणेश राख हे ‘बेटी बचाओ जनआंदोलन’ या उपक्रमांतर्गत गेल्या दशकभरापासून मुलींच्या जन्मासाठी मोफत प्रसूती करत आहेत. त्यांच्या हडपसर येथील मदरहुड हॉस्पिटल मध्ये आतापर्यंत हजाराहून अधिक मुलींच्या प्रसूती पूर्णपणे विनामूल्य झाल्या आहेत. डॉ. राख यांच्या मते, “जेव्हा समाज मुलीच्या जन्माचा खऱ्या अर्थाने आनंद साजरा करू लागेल, तेव्हा मी पुन्हा फी घेण्यास सुरुवात करेन.”
अलीकडेच एका आयएएस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर डॉ. राख यांची कथा शेअर केली होती. त्यानंतर आनंद महिंद्रांचे लक्ष या पोस्टकडे गेले. महिंद्रांनी लिहिले, “दोन मुलींचा पिता म्हणून मला माहीत आहे की परीच्या जन्माने किती आनंद मिळतो. पण हे डॉक्टर स्वतः देवदूतच आहेत. दया आणि उदारतेचे प्रतीक आहेत.”
त्यांनी पुढे लिहिले की, “आठवड्याची सुरुवात याहून चांगली होऊच शकत नाही – स्वतःला विचार करा की तुमचे काम समाजावर सकारात्मक परिणाम कसे करू शकते.”
डॉ. गणेश राख यांचा हा उपक्रम केवळ प्रसूतीपुरता मर्यादित नसून तो थेट स्त्री-भ्रूणहत्या आणि लैंगिक भेदभावाविरुद्ध लढा देतो. त्यांनी निर्माण केलेली ही चळवळ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सोशल मीडियावरही लोक मोठ्या प्रमाणावर त्यांचे कौतुक करत असून काहींनी त्यांना “देवदूत” असे संबोधले आहे.
डॉ. राख यांची सेवा ही समाजाला मुलींच्या जन्माचा सन्मान करण्याची आणि खऱ्या अर्थाने लिंग समानतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारी आहे.