पुण्यात डेंग्यू-चिकुनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव; ऑगस्टमध्ये ४५८ नवे रुग्ण



पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवतापासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, फक्त ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ४५२ संशयित रुग्ण आढळले आहेत, तर चिकुनगुनियाचे ४ आणि हिवतापाचे २ रुग्ण नोंदवले गेले आहेत.

यंदा जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या १ हजार ७१ वर पोहोचली असून, त्यापैकी ४१ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. मासिक आकडेवारीनुसार, जानेवारीत ३९, फेब्रुवारीत ३१, मार्चमध्ये १८, एप्रिलमध्ये १९, मे महिन्यात २३, जूनमध्ये १२३, जुलैमध्ये ३६६ आणि ऑगस्टमध्ये ४५२ रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने डास नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबवली आहे. या महिन्यातच २१७ डासोत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्यात आली असून, त्यासाठी १ लाख ९५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यावर्षी एकूण २ हजार १२७ डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत आणि संबंधित मालकांकडून ३ लाख ८८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेने १२ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण केले असून, त्यात १० हजार ३९ घरांमध्ये डासोत्पत्ती आढळली आहे. या घरांमध्ये धूर फवारणी करून डास नियंत्रणाची उपाययोजना करण्यात आली आहे, असे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.

👉 चिकुनगुनिया रुग्णसंख्या: यंदा एकूण १६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात फेब्रुवारीत ६, एप्रिलमध्ये २, जूनमध्ये २, जुलैमध्ये २ आणि ऑगस्टमध्ये ४ रुग्णांचा समावेश आहे.
👉 हिवताप रुग्णसंख्या: यावर्षी एकूण ३ रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या दररोज सरासरी ३५ डेंग्यू संशयित रुग्णांची भर पडत असल्याने पुण्यातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


Leave a Comment