नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित गट-ब) पदाच्या भरती प्रक्रियेत निवड झालेले ३१ उमेदवार अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला, एप्रिलमध्ये कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली, तरीही ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे नियुक्ती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही.
डिसेंबर २०२३ मध्ये या पदासाठी जाहिरात निघाली होती. त्यानंतर आरक्षण सुधारित करण्यासाठी परीक्षा काही महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात आली. अखेर १८ ऑगस्ट २०२४ रोजी चाळणी परीक्षा, तर डिसेंबरमध्ये मुलाखती पार पडल्या. निकाल २८ जानेवारी २०२५ रोजी लागला, तर सुधारित निकाल ३ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आला. सर्व टप्पे पूर्ण करूनही उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
उमेदवारांची चिंता वाढली
एमपीएससीसारख्या कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाल्यानंतर उमेदवारांना जलदगतीने नेमणुकीवर रुजू होण्याची अपेक्षा होती. मात्र मंत्रालयाकडून सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे उमेदवार मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत.
पदोन्नतीसाठी नियुक्ती रोखली?
दरम्यान, ओबीसी मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांची लवकरच ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब’ पदावर पदोन्नती होणार आहे. या पदोन्नतीसाठीच एमपीएससीद्वारे निवड झालेल्या ३१ उमेदवारांची नियुक्ती मुद्दाम थांबवली गेल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये अधिक अस्वस्थता आहे.
विभागाचे स्पष्टीकरण
या संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांनी सांगितले की, “या नियुक्त्यांवर मंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांत कारवाई करून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. उमेदवारांनी चिंता करण्याची गरज नाही.”
मात्र विद्यार्थ्यांच्या संघटनांनी याला विरोध दर्शवला असून, नियुक्ती प्रक्रियेत होणारा अन्याय तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.