मुंबई: राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी शिक्षण विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सुमारे ५ हजार ४२७ शाळांची प्रत्यक्ष तपासणी १५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान केली जाणार आहे. शाळांनी दिलेल्या स्वमूल्यांकनातील माहिती खरी आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
१९०० पथक सज्ज, ७५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
शाळांच्या तपासणीसाठी राज्यभरातून १९०० पथके गठित करण्यात आली असून, प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक पथकात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, डायट अधिव्याख्याता व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे. या पथकांना सहा शाळा तपासण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
स्कॉफ आराखड्याअंतर्गत मूल्यांकन
शाळांचे मूल्यांकन नॅकच्या धर्तीवर करण्यासाठी राज्य सरकारने ‘शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SCAF)’ तयार केला आहे. यासाठी ‘राज्य शाळा मानक प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत राज्यातील १,०८,५३० शाळांनी स्वतःचे मूल्यांकन केले होते. त्यामधून ५% शाळांची म्हणजेच ५४२७ शाळांची तपासणी राज्यस्तरावरून निवडून केली जाणार आहे.
तपासणीसाठी शाळांची निवड आणि सूचना
शाळांची निवड राज्यस्तरावरून झाली असून, तपासणीसाठी पथकांना संबंधित शाळांचे नाव तीन दिवस आधी कळविले जाणार आहे. शाळांनी स्वमूल्यांकनात दिलेली माहिती व प्रत्यक्ष निरीक्षणात फरक आढळल्यास त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय तपासणीची माहिती
- नागपूर – २०१ शाळा : ७९ पथके
- यवतमाळ – १६५ शाळा : ७० पथके
- अमरावती – १४५ शाळा
- चंद्रपूर – १२४ शाळा : ५७ पथके
- बुलडाणा – १२६ शाळा : ५६ पथके
- गडचिरोली – १०० शाळा : ४६ पथके
- गोंदिया – ८२ शाळा : ३० पथके
- वर्धा – ६९ शाळा : २८ पथके
- वाशीम – ५९ शाळा : २२ पथके
- अकोला – ९१ शाळा : ३५ पथके
- भंडारा – ६५ शाळा : २९ पथके
शाळांच्या गुणवत्तेसाठी सकारात्मक पाऊल
शाळांचे दर्जात्मक मूल्यांकन आणि सुधारणा करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यातून शाळांच्या प्रशासन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी घडामोडी, गुणवत्ता सुधारणा इत्यादी मुद्द्यांवर बारीक निरीक्षण होणार आहे.
NewsViewer.in कडून या तपासणी मोहिमेवर सतत लक्ष ठेवण्यात येणार असून पुढील घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा.