वैद्यकीय प्रवेशासाठी मुदतवाढ; आता ४ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

MBBS Admission Maharashtra, CET Cell News:

मुंबई: राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून इच्छुक विद्यार्थ्यांना आता ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीथी, बीओथी, बीएससी नर्सिंग आणि बीव्हॉस अशा कोट्यांअंतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने ही सुविधा दिली आहे. याआधी ३० जुलै ही अंतिम तारीख होती, मात्र अनेक विद्यार्थ्यांनी वेळेअभावी अर्ज करू न शकल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना ४ ऑगस्ट रात्री ११.५९ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम संधी आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस व बीडीएससाठी प्रवेशासाठी केलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी व उपलब्ध जागांची माहिती ६ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल. यानंतर ११ ऑगस्ट रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. या निवड यादीतील विद्यार्थ्यांना ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश पूर्ण करावा लागेल.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही संधी वापरून लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment