LLB 2025, Law Admission Maharashtra:
मुंबई – राज्यातील विधी तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET Cell) या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून अंतिम गुणवत्ता यादी २ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा एलएल.बी (LLB) अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी यंदा एकूण ७४,६६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यापैकी ७०,६२९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यातले ६९,५९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले, आणि ६५,३५९ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केले.
ऑनलाइन दस्तऐवज पडताळणीच्या प्रक्रियेनंतर २८ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. आता त्यानंतर २ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालय पसंतीक्रम भरायची प्रक्रिया राबवली जाईल.
या प्रक्रियेनंतर ८ ऑगस्ट रोजी प्रवेशासाठी पहिली निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे.