मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाइनच्या डिनोहो विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्जनशील आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी या विद्यापीठाने सहा महिन्यांच्या कालावधीचे दोन नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
हे दोन अभ्यासक्रम “छायाचित्रण (फोटोग्राफी)” आणि “इंटिरिअर डिझाइन” या विषयांवर आधारित असून, विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला व्यावसायिक कौशल्यांची जोड देणारे आहेत. या अभ्यासक्रमांची रचना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार करण्यात आली असून प्रत्येक अभ्यासक्रमात केवळ २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
प्रत्येक अभ्यासक्रमात ४० श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे, त्यात २० श्रेणी पुस्तकाधारित (थिअरी) आणि २० श्रेणी प्रात्यक्षिकात्मक (प्रॅक्टिकल) असतील. या अभ्यासक्रमांसाठी शुल्क १०,००० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचा मेळ साधणारे हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी करिअरला दिशा देणारे ठरणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेस चालना देणाऱ्या या अभ्यासक्रमांद्वारे त्यांना डिजिटल युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जाणार आहेत. डिनोहो विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे नवोदित कलाकार व डिझायनर्सना व्यावसायिक जगात पाय रोवण्याची संधी मिळेल.