इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर अभ्यासक्रमांची आयटीआयमध्ये वाढती क्रेझ: तिसऱ्या फेरीनंतरही प्रचंड प्रतिसाद


मुंबई
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वर्षानुवर्षे बदलत असून, यंदा 2025 प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरीनंतरही इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यभरातील आयटीआय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक अर्ज केले आहेत. एकूण २४,४४० जागांपैकी १६,१२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यात २,२२८ महिला विद्यार्थिनींचा समावेश आहे.

दुसऱ्या क्रमांकावर फिटर अभ्यासक्रम असून, एकूण १९,५०० जागांपैकी ९,२२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये ३५१ मुलींचाही समावेश आहे.

वेल्डर अभ्यासक्रम सुद्धा मागे नाही. एकूण १६,८२० जागांपैकी ८,२६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन या कोर्सला तिसरे स्थान मिळवून दिले आहे.

इतर प्रमुख अभ्यासक्रमांची आकडेवारी:

  • कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) – ५,४६५ प्रवेश
  • मेकॅनिक डिझेल – ४,७०६ प्रवेश

काही अभ्यासक्रम मात्र रिकामे

सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या या कोर्सेसच्या उलट चित्रही दिसून येते. राज्यभरातील जवळपास २० अभ्यासक्रम असे आहेत, ज्यामध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. हे कोर्स विद्यार्थ्यांच्या गरजांना आणि सध्याच्या औद्योगिक मागणीला साजेसे नसल्यामुळे अप्रसिद्ध राहत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कौशल्य विकासावर सरकारचा भर

राज्य सरकारकडून कौशल्य विकास अभियानांतर्गत आयटीआय अभ्यासक्रमांना मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षण प्रणालीतील बदल, रोजगाराची वाढती गरज आणि विद्यार्थ्यांच्या मनातील स्वावलंबी भविष्यासाठीचा विचार यामुळे आयटीआयला पसंती वाढली आहे.

महिलांचा सहभाग – एक सकारात्मक बदल

पूर्वी केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिला विद्यार्थिनींचाही उल्लेखनीय सहभाग दिसून येत आहे. विशेषतः इलेक्ट्रिशियन आणि फिटर कोर्समध्ये महिला उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे.


Leave a Comment