भारतीय आरोग्य क्षेत्राला मोठे यश मिळाले असून, देशातील शास्त्रज्ञांनी मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) आणि भुवनेश्वर येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राच्या (RMRC) वैज्ञानिकांनी ही लस विकसित केली आहे.
संक्रमण होण्याआधीच मलेरियाला अटकाव
‘डगएपिफ्लिक्स’ (DgEpifliks) नावाची ही लस केवळ उपचारात्मक नाही, तर प्रतिबंधात्मक आहे. म्हणजेच, ही लस मलेरियाचा परजीवी रक्तप्रवाहात शिरण्याआधीच त्याला रोखते. पारंपरिक लसी परजीवी शरीरात आल्यानंतर काम करतात, तर ही लस संक्रमणाच्या आधीच अडथळा निर्माण करते, त्यामुळे समाजपातळीवर संसर्गाचा प्रसारही रोखता येतो.
ही लस तयार करताना लॅक्टोकोकस लॅक्टिस नावाचा सुरक्षित जीवाणू वापरण्यात आला आहे, जो सामान्यतः पनीर व ताकात आढळतो. त्यामुळे ही लस संपूर्णतः जैवसुरक्षित आहे.
जगात उपलब्ध लसींपेक्षा अधिक प्रभावी
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या दोन मलेरियावरील लसींची कार्यक्षमता ३३% ते ६७% दरम्यान आहे. परंतु भारतीय लशीचा प्रभाव द्विगुणित असल्याचे पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या लसीला जागतिक आरोग्य संस्थांकडून विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
स्वदेशी निर्मितीमुळे आरोग्य स्वायत्ततेकडे वाटचाल
या लसीचं आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिची स्वदेशी निर्मिती. यापूर्वी भारताला मलेरियाच्या उपचारांसाठी परदेशी औषधांवर आणि लसींवर अवलंबून राहावं लागे. हे केवळ खर्चिक नव्हते, तर आरोग्य धोरणांवर अस्थिरतेचा धोका निर्माण करीत होते. डगएपिफ्लिक्स ही लस त्यामुळे भारताच्या आरोग्य स्वायत्ततेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
ग्रामीण भारताला मोठा दिलासा
मलेरियामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो आणि लाखो कुटुंबं आर्थिक अडचणीत सापडतात. ही लस केवळ मृत्यू रोखणार नाही, तर उपचाराचा खर्चही कमी करणार आहे. विशेषतः गर्भवती स्त्रिया, शेतमजूर आणि गावांतील गरीब नागरिकांसाठी ही लस आयुष्यवाढीची ठरू शकते.
आर्थिक, सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्यासाठी फायदेशीर
ही लस सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. गरिबांपर्यंत लसीकरण पोहोचवणे हे सरकारसाठी आणि आरोग्य संस्थांसाठी आवश्यक ठरणार आहे. WHO नेही लसीकरणच मलेरियावर नियंत्रणासाठी सर्वोत्तम उपाय असल्याचे मान्य केले आहे.
सध्या वापरात असलेल्या दोन लसींपैकी RTS,S/AS01 ही 2022 मध्ये घाना व नायजेरिया येथे वापरण्यात आली आहे. मात्र भारतीय लसीचे प्रभाव आणि सुरक्षा दोन्ही अधिक असल्याचे संकेत मिळाले आहेत.