बिहारमधील गया जिल्ह्यात होमगार्ड भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरतीसाठी आलेल्या एका युवतीवर तिच्या प्रकृती बिघडल्यावर उपचारासाठी नेत असताना रूग्णवाहिकेतच बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना रविवारी घडली असून आरोपी चालक आणि तंत्रज्ञाला अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरती प्रक्रियेदरम्यान एक महिला बेशुद्ध पडली होती. तिला तत्काळ उपचारासाठी मैदानावरील वैद्यकीय व्यवस्थेतून रूग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र रूग्णवाहिकेतील चालक आणि तंत्रज्ञाने महिलेशी जबरदस्ती केल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. पीडित युवतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, चालक संजीव कुमार आणि तंत्रज्ञ राकेश कुमार यांनी हा अमानुष प्रकार केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ दोघांना अटक केली. पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तपासादरम्यान रूग्णवाहिकेतील फूटेज आणि साक्षीदारांचे जबाब गोळा करण्यात येत आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींवर POSCO कायदा आणि अन्य संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट पसरली असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.