मुंबई– महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी गुरुवार, 31 जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
राज्यभरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्यांनंतर आतापर्यंत जवळपास 14 लाख 32 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 9 लाख 60 हजार 444 विद्यार्थ्यांनी ‘कॅप’ राऊंडमधून प्रवेश निश्चित केला आहे. याशिवाय, अल्पसंख्याक, इनहाउस व व्यवस्थापन कोटांतर्गत सुमारे 9 हजार 430 विद्यार्थ्यांनीही आपला प्रवेश निश्चित केला आहे.
गुरुवारी जाहीर होणाऱ्या चौथ्या यादीनंतर विद्यार्थ्यांना 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान आपले प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित करावा लागणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी व उच्च माध्यमिक शाळांनी 1 ऑगस्टपूर्वी वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत.
या फेरीसाठी सोमवारी एकट्या दिवशी 3 हजार 115 नव्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कमी टक्केवारी व उच्च कटऑफ असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी या यादीतून मिळण्याची अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांना सुचवले जाते की त्यांनी आपली नावे चौथ्या यादीत आल्यास दिलेल्या वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून वर्गात सामील व्हावे.