मुंबई | गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर मोठा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
या मोहिमेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर यांचा सक्रिय सहभाग आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळे देखील या उपक्रमाशी जोडली गेली आहेत.
गणेश मंडपांमध्ये किंवा त्यांच्या परिसरात उभारलेल्या या शिबिरांमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळवून देण्याची सुविधा दिली जात आहे.
नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात येत असून, तपासणीत आजार आढळल्यास पुढील मोफत उपचारही उपलब्ध करून दिले जात आहेत. या मोहिमेचा उद्देश केवळ आरोग्य तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जनजागृती करणे हा आहे.
या उपक्रमासाठी गणेश मंडळांकडून मागील काही दिवसांपासून व्यापक जनजागृती करण्यात आली. परिणामी नागरिक मोठ्या संख्येने शिबिरांचा लाभ घेत आहेत. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहिमेमुळे हजारो नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचार मिळत असून, हा उपक्रम लोकाभिमुख आरोग्यसेवेचा उत्तम आदर्श ठरत असल्याचे मत मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केले आहे.