जनुक-संपादन (Gene Editing) हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. मानवाच्या डीएनएमधील दोष दूर करून अनेक गंभीर अनुवंशिक आजारांवर उपचार करणारे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आरोग्यसेवेसाठी मोठी आशा निर्माण करत आहे. त्यामध्ये ‘क्रीस्पर-कॅस ९’ (CRISPR-Cas9) हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. हे तंत्रज्ञान केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर भविष्यातील अनेक वैद्यकीय संधींचे दरवाजे उघडते.
क्रीस्पर-कॅस ९ म्हणजे काय?
‘CRISPR’ म्हणजे Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats आणि ‘Cas9’ म्हणजे CRISPR-associated protein 9. हे तंत्रज्ञान जणू डीएनए टायपो सुधारणारे सॉफ्टवेअर आहे. ज्या प्रकारे आपण चुकलेले अक्षर टायपिंगमध्ये व्हाइटनरने दुरुस्त करतो, तशीच कार्यपद्धती ही आहे. CRISPR-Cas9 विशिष्ट डीएनए अनुक्रमांना ओळखून ते कापते आणि आवश्यक दुरुस्त्या करते.
वैद्यकीय क्षेत्रातील वापर:
या तंत्रज्ञानामुळे अनेक अनुवंशिक आजारांवर थेट जनुकस्तरावर उपाय करणं शक्य झालं आहे. त्यात खालील आजारांचा समावेश होतो:
- सिकल सेल अॅनिमिया
- बीटा थॅलेसेमिया
- डाऊन सिंड्रोम
- काही प्रकारचे कॅन्सर
- दृष्टिदोष व अंधत्व
- मज्जातंतूंचे विकार
कॅसगेव्ही उपचारपद्धती – एक क्रांतीकारी टप्पा:
Casgevy ही CRISPR-Cas9 तंत्रज्ञानावर आधारित जगातील पहिली अधिकृत जनुकीय उपचारपद्धती आहे. याचा विकास Vertex Pharmaceuticals आणि CRISPR Therapeutics या अमेरिकन कंपन्यांनी केला आहे.
या पद्धतीत रुग्णाच्या अस्थिमज्जेमधून स्टेमसेल्स काढल्या जातात. प्रयोगशाळेत त्या पेशींमधील दोष दूर करून सुधारित जनुक पुन्हा शरीरात प्रत्यारोपित केल्या जातात. त्यामुळे शरीरात पुन्हा निरोगी हिमोग्लोबिन तयार होतो आणि ऑक्सिजन वहन सुधारते.
किंमत आणि भविष्यातील शक्यता:
सध्या या उपचारपद्धतीचा खर्च लाखो रुपयांमध्ये आहे. मात्र, भविष्यात या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर झाल्यास त्याचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. संशोधन आणि आरोग्य धोरणांमध्ये गुंतवणूक वाढल्यास, भारतासारख्या देशातही हे उपचार सामान्यांपर्यंत पोहोचू शकतील.
शास्त्रीय संशोधनातील उपयोग:
क्रीस्पर तंत्रज्ञानाचा वापर केवळ उपचारांपुरता मर्यादित नाही. त्याचा उपयोग नवीन औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञानातील संशोधन, एड्सवर नियंत्रण, वंशपरंपरागत अंधत्वाच्या उपचारातही केला जात आहे. त्यामुळे हा वैज्ञानिक प्रगतीचा एक नवा अध्याय आहे.
निष्कर्ष:
क्रीस्पर-कॅस ९ हे तंत्रज्ञान मानवाच्या आरोग्य इतिहासात एक मैलाचा दगड ठरत आहे. हे केवळ आजारांवर उपाय करण्यापुरते मर्यादित न राहता, रोगमुक्त मानवजातीच्या दिशेने झेप घेणारा क्रांतीकारी टप्पा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, जनजागृती आणि योग्य धोरणे यांची सांगड घालता आली, तर भारताला या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवता येईल.