UPSC Success Story: देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा म्हटली तर ती म्हणजे UPSC नागरी सेवा परीक्षा. लाखो तरुण या परीक्षेत बसतात, परंतु फक्त काहीच उमेदवार IAS, IPS, IRS किंवा IFS सारख्या प्रतिष्ठित पदांपर्यंत पोहोचतात. या निवडक यशस्वी उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून आलेले कुलदीप द्विवेदी (Kuldeep Dwivedi) यांचे नाव घेतले जाते. त्यांची यशोगाथा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
सामान्य कुटुंबातून UPSC पर्यंतचा प्रवास
कुलदीप द्विवेदी उत्तर प्रदेशातील निगोह जिल्ह्यातील शेखपूर गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील सूर्यकांत द्विवेदी लखनौ विद्यापीठात सिक्युरिटी गार्ड (Security Guard) म्हणून काम करत होते. फक्त 1,100 रुपयांच्या पगारावर घर चालवणे आणि चार मुलांचे शिक्षण करणे ही मोठी कसरत होती. यासाठी त्यांचे वडील शेतातही मजुरी करत असत.
अशा परिस्थितीतही कुलदीप यांनी शिक्षणाला कधीही अडथळा मानले नाही. त्यांनी 2009 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून पदवी आणि 2011 मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
कोचिंग नाही, मोबाईल नाही – फक्त आत्मविश्वास
यूपीएससीची तयारी करताना कुलदीप यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे नव्हते. मोबाईल फोनही त्यांच्याकडे नव्हता. घरच्यांशी संपर्क साधण्यासाठी ते पीसीओ बूथचा वापर करत असत. अभ्यासासाठी त्यांनी मित्रांकडून आणि इतर उमेदवारांकडून पुस्तके उधार घेतली. पूर्णपणे स्व-अभ्यास (Self Study) करून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली.
पहिल्याच प्रयत्नात UPSC फत्ते
2015 मध्ये कुलदीप यांनी पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षा दिली आणि अखिल भारतीय स्तरावर 242 वा क्रमांक (AIR 242) मिळवला. या यशामुळे त्यांची निवड आयआरएस (IRS Officer) पदासाठी झाली.
त्यांच्या या यशाने केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल झाले. गरीबीतून उभं राहून, पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होण्याची त्यांची कहाणी आज लाखो उमेदवारांना प्रेरणा देते.
शिकवण काय?
कुलदीप द्विवेदींचा प्रवास दाखवून देतो की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवणे शक्य आहे. कोचिंग किंवा महागड्या सोयीसुविधा नसल्या तरी स्व-अभ्यास आणि दृढनिश्चय यामुळेही UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करता येते.