पुणे महापालिकेची भरती फक्त ऑनलाइन! फसवणुकीपासून नागरिकांनी राहावे सावध

पुणे महापालिकेतर्फे अभियांत्रिकी संवर्गातील विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेबाबत काही गैरप्रकार समोर येत असून, पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवून उमेदवारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, ही भरती प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येणार असून कोणत्याही व्यक्तीकडे थेट संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.

महापालिकेच्या संकेतस्थळाशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाहिराती, माहिती किंवा आश्वासने अप्रमाणित आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

महापालिकेकडून २०२२ पासून विविध पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या कारणास्तव अभियांत्रिकी संवर्गातील भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र ती उठवून आता १६९ अभियंता पदांसाठी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाणार असून कोणतेही गुप्त किंवा शिफारसीवर आधारित मार्ग उपलब्ध नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नोकरीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांना बळी पडू नये, कोणत्याही शंकेसाठी थेट महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाची मदत घ्यावी आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवावा, असे महापालिकेचे आवाहन आहे.

Leave a Comment