पुणे : शहरातील झपाट्याने वाढणारे शहरीकरण, औद्योगिक क्रिया, वाहतूक कोंडी आणि सतत सुरू असलेली बांधकामे यामुळे पुण्यातील हवेची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत गंभीर पातळीवर पोहोचली आहे. महापालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरण अहवालानुसार, खराब हवेचे दिवस लक्षणीय वाढले असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या फुप्फुसांच्या आरोग्यावर होत आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, प्रदूषणामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) आणि फुप्फुसाचा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यामध्ये विशेषतः पीएम २.५ हे सूक्ष्म प्रदूषणकारी कण चिंतेचा विषय आहेत. हे २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असल्याने हवेत सहज मिसळतात आणि श्वसनमार्गातून थेट फुप्फुसांत पोहोचतात.
हे सूक्ष्म कण मुख्यतः वाहतुकीतील धूर, बांधकामातून उडणारी धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि कचरा जाळण्यामुळे हवेत पसरतात. दीर्घकाळ या कणांच्या संपर्कात राहिल्यास फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते, श्वसनमार्गात सूज येते आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
फिजिशियन डॉ. गीतांजली पाटील सांगतात, “हवेतील सूक्ष्म कण, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड हे फुप्फुसांमध्ये जाऊन जळजळ, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास निर्माण करतात. आधीपासून दम्याचे रुग्ण असतील तर त्यांना प्रदूषित हवेमुळे अधिक त्रास होतो. लहान मुलांची फुप्फुसे अजून विकसित होत असल्याने त्यांच्यावर याचा दुष्परिणाम जास्त होतो.”
कर्करोगतज्ज्ञ डॉ. चैत्रा देशपांडे यांचे मत आहे की, हवा प्रदूषणामुळे सतत खोकला येणे हे छातीतील संसर्ग किंवा फुप्फुसांच्या आजाराचे लक्षण असू शकते. हे लक्षण दुर्लक्षित न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
- घरातून बाहेर पडण्यापूर्वी हवेची गुणवत्ता तपासा.
- प्रदूषण जास्त असलेल्या भागात जाणे टाळा.
- मास्कचा नियमित वापर करा.
- घरात हवा शुद्धिकरण यंत्र वापरा.
- धूम्रपान टाळा.
- खराब हवेच्या दिवशी बाहेर व्यायाम करणे टाळा.
पुण्यासारख्या जलदगतीने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये स्वच्छ हवा ही केवळ पर्यावरणाचा नव्हे तर आरोग्याचा गंभीर विषय झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.