आपल्या पेशींना ऊर्जा पुरवणाऱ्या ‘पॉवरहाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माइटोकॉन्ड्रिया यांच्याविषयी नवे आणि क्रांतिकारी संशोधन समोर आले आहे. आतापर्यंत केवळ ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या पेशी-घटकांची आता रोगप्रतिकारक शक्तीतही निर्णायक भूमिका असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
एका नव्या अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की माइटोकॉन्ड्रिया सूक्ष्मजीव, विशेषतः जिवाणूंवर (बॅक्टेरिया) लक्ष ठेवतात, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना नष्ट करण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना मदत करतात. ही क्षमता ऑटोइम्यून आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी नव्या आशेचा किरण ठरू शकते.
न्यूट्रोफिल्सची पहिली प्रतिक्रिया आणि माइटोकॉन्ड्रियाचे योगदान
आपल्या शरीरात एखादा जंतू प्रवेश करताच न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या रक्तपेशी सर्वप्रथम त्या ठिकाणी धाव घेतात. त्या घटनास्थळी पोहोचल्यावर, त्या ‘न्यूट्रोफिल एक्स्ट्रासेल्युलर ट्रॅप्स’ (NETs) नावाची जाळी तयार करतात. हे जाळे डीएनए व अँटीमायक्रोबियल प्रथिनांनी बनलेले असते आणि त्याद्वारे जंतूंना अडवले जाते.
नवीन संशोधनानुसार, या प्रक्रियेत माइटोकॉन्ड्रिया ‘लॅक्टेट’ नावाच्या घटकाचे प्रमाण वाढते का हे लक्षात घेतात. ‘लॅक्टेट’ हा घटक सामान्यतः स्नायूंच्या थकव्याशी संबंधित असला तरी बॅक्टेरियल संसर्गात तो एक चेतावणी संकेत म्हणून वापरला जातो. माइटोकॉन्ड्रिया हे संकेत ओळखून न्यूट्रोफिल्सना NET तयार करण्यासाठी उत्तेजित करतात.
रोगप्रतिकारक शक्तीत माइटोकॉन्ड्रियाचा नवा अध्याय
या शोधामुळे माइटोकॉन्ड्रियाचे कार्य केवळ ऊर्जानिर्मितीपुरते मर्यादित नसून, ते शरीराच्या संवेदनक्षम संरक्षण व्यवस्थेचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ऑटोइम्यून डिसऑर्डर आणि दीर्घकालीन संसर्गाशी संबंधित उपचारांमध्ये याचा वापर होऊ शकतो.
वॉशिंग्टनमधील या अभ्यासामुळे लवकरच अशा औषधांची निर्मिती होण्याची शक्यता आहे, जी माइटोकॉन्ड्रियाच्या या क्षमतेचा उपयोग करून रोगप्रतिकारक प्रतिसाद अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करतील.