एलन मस्क यांनी केलं भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक, भारतात 1 दिवसात 640 दशलक्ष मोजणी आणि अमेरिकेत

जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक एलन मस्क यांनी भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक करत अमेरिकेच्या मतमोजणी प्रक्रियेवर टीका केली आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीतील वेगवान मतमोजणीची प्रशंसा करताना, मस्क यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या संथ मतमोजणी प्रक्रियेला “दुःखद” म्हटले आहे.

एलन मस्क यांनी X वर एका पोस्टला उत्तर देताना लिहिले, “भारताने एका दिवसात 640 दशलक्ष (64 कोटी) मतांची मोजणी केली, परंतु कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे.” त्यांच्या या विधानाने भारताच्या निवडणूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला आहे.

दरम्यान, अमेरिकेत 5-6 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, मात्र 18 दिवस उलटूनही कॅलिफोर्नियामध्ये 15 दशलक्ष (1.5 कोटी) मतांची मोजणी सुरूच आहे. इतर राज्यांतील मतमोजणी पूर्ण झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. ट्रम्प जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमधील मतभेद


अमेरिकेतील संथ मतमोजणीवर चर्चा करताना, मस्क यांनी भारतीय निवडणूक व्यवस्थेतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) आणि अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या बॅलेट पेपर प्रणालीमधील फरक अधोरेखित केला. भारताने अनेक वर्षांपूर्वी मतदानासाठी ईव्हीएमचा अवलंब केला आहे, ज्यामुळे मतमोजणी प्रक्रियेचा वेग वाढला आहे.


परंतु, याआधी मस्क यांनी ईव्हीएम प्रणालीवरही शंका व्यक्त केली होती. जुलै महिन्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना “धोकादायक” म्हटले होते आणि बॅलेट पेपर आणि प्रत्यक्ष मतदान प्रणालीला अधिक सुरक्षित मानले होते. त्यांच्या मते, ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हॅक होण्याचा धोका असतो.

भारतीय निवडणूक आयोगाने दरवर्षी ज्या पद्धतीने वेगवान आणि पारदर्शक मतमोजणी केली जाते, त्याचे मस्क यांनी कौतुक केले आहे. परंतु, अमेरिकेतील प्रक्रियेवर त्यांनी व्यक्त केलेली नाराजी निवडणूक व्यवस्थेमधील मूलभूत फरकांवर लक्ष केंद्रित करते.

Leave a Comment