पुणे – राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील २३५ खासगी अनुदानित आश्रमशाळांना अत्याधुनिक व्यावसायिक कपडे धुण्याची यंत्रे (वॉशिंग मशिन) पुरविण्यात येणार आहेत. या योजनेसाठी विभागाकडून तब्बल १३ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
सध्या विभागाच्या अखत्यारीत ९८० प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य सुविधा, क्रीडा साहित्य, अंथरुण-पांघरुण आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. बहुतेक विद्यार्थी निवासी असल्याने, कपडे स्वतः धुणे त्यांच्यासाठी वेळखाऊ आणि कष्टप्रद ठरते. त्यामुळे त्यांच्या अभ्यास व क्रीडा उपक्रमांवर परिणाम होतो.
यापूर्वी ३५० आश्रमशाळांना यंत्रे मिळाली
राज्यातील पहिल्या टप्प्यात ५८५ आश्रमशाळांपैकी ३५० आश्रमशाळांना ही यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. आता उर्वरित २३५ आश्रमशाळांनाही ही सुविधा मिळणार आहे. यामुळे कपडे व्यवस्थित धुतले जातील, जंतुसंसर्ग टळेल आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका कमी होईल.
निविदा प्रक्रिया व जबाबदारी
यंत्रांची खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही यंत्रे शासकीय मालमत्ता असल्याने त्यांची देखभाल व संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांच्यावर राहील.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सुलभता मिळून त्यांच्या शिक्षण व खेळासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. तसेच, आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.