‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स’ (WCL 2025) या बहुप्रतिक्षित स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारत चॅम्पियन्स संघानं पाकिस्तान चॅम्पियन्स संघाविरुद्ध सामना खेळण्यास ठाम नकार दिला आहे. हा सामना गुरुवारी, 31 जुलै रोजी नियोजित होता. मात्र, देशहित व राष्ट्रीय भावना यांना प्राधान्य देत भारतीय खेळाडूंनी सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.
29 जुलै रोजी भारताने वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघावर 13.2 षटकांत विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं होतं. तरीदेखील, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत भारतीय संघाने पूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. या निर्णयामागे केवळ खेळाडूच नाही, तर प्रमुख प्रायोजक कंपनी ‘EaseMyTrip’ देखील उभी राहिली आहे.
EaseMyTrip चे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी ट्विट करत म्हटलं, “दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र नांदू शकत नाहीत. आम्ही भारतीय नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन उपांत्य सामन्याच्या प्रायोजकत्वातून माघार घेत आहोत.”
सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज माजी खेळाडूंनी देखील पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याची ठाम भूमिका घेतली आहे. विशेषतः शिखर धवनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक जुना ईमेल शेअर करत म्हटलं, “मी 11 मे रोजी जो निर्णय घेतला, त्यावर आजही ठाम आहे. माझ्यासाठी देश सर्वकाही आहे – देशापेक्षा काहीही मोठं नाही. जय हिंद!”
या निर्णयामुळे WCL 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता असलेल्या क्रिकेटप्रेमींना निराशा झाली असली, तरी देशहितासाठी घेतलेल्या या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, भारताने स्पर्धेची सुरुवात निराशाजनक केली होती – त्यांना पहिल्या तीन सामन्यांत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयाने संघानं जबरदस्त पुनरागमन केलं.
WCL 2025 मधील हा निर्णय फक्त एका क्रिकेट सामन्यापुरता न राहता, देशाच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या भूमिका म्हणून इतिहासात नोंदला जाईल, अशी प्रतिक्रिया क्रिकेट विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.