कोल्हापूर | 19 ऑगस्ट 2025
वारणा धरण परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री (19 ऑगस्ट) 8 वाजल्यापासून वक्रद्वाराद्वारे सुरू असलेला 34,732 क्युसेक विसर्ग वाढवून 38,370 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. याशिवाय, विद्युतगृहातून 1,630 क्युसेक पाणी सोडले जाणार असून एकूण 40,000 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात विसर्ग केले जाणार आहे.
धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने पुढील काही तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. धरण व्यवस्थापनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, स्थानिक प्रशासनानेही आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे.
गावकऱ्यांनी अनावश्यक हालचाल टाळावी, नदीकाठाजवळ जाऊ नये, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वारणा धरण व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी सतत वाढत आहे. त्यामुळे पुढील 24 तास नागरिकांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.