कोल्हापूर — सततच्या पावसामुळे कोयना व वारणा धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. मात्र आज सकाळपासून या विसर्गामध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे. तरीही नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोयना धरणाचा विसर्ग सकाळी ६ वाजता कमी करून 82,100 क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे. तर वारणा धरणाचा विसर्ग सकाळी ७ वाजता 15,369 क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे. यामध्ये वक्रद्वारातून 13,739 क्यूसेक्स व विद्युतगृहातून 1,630 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोडी कमी झाल्याने धरणाची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही धरण प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, वारणा व कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला असून नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठाला जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.