जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर मंगळवारी दुपारी भूस्खलन (landslide) झाले. या दुर्घटनेत 5 भाविकांचा मृत्यू झाला असून, 14 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
दरड अर्द्धकुमारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोसळली. या ठिकाणी साधारणतः यात्रेच्या अर्ध्या मार्गावर भाविकांची वर्दळ असते. दरड कोसळताच यात्रेतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, हिमकोटी मार्गावरील यात्रा सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. मात्र जुन्या मार्गावरून यात्रा सुरू होती. पण दुपारी मुसळधार पावसामुळे हा मार्गही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, डोडा जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली असून, तवी नदीला पूर आला आहे. नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे चौथ्या तवी पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे. इथेही चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रशासनाने सांगितले की, सततच्या पावसामुळे अनेक भागांत घरांचे, रस्त्यांचे व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. स्थानिकांना विशेषतः डोंगराळ व सखल भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र बचाव आणि मदतकार्य सुरू असून, हवामान सुधारल्यानंतरच वैष्णो देवी यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.