उत्तरकाशी (उत्तराखंड): उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री घाटीमध्ये सोमवारी झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड पुर आला असून, यामध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता असून, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे भागातील अनेक घरे, हॉटेल्स आणि वाहने नष्ट झाली आहेत.
या दुर्घटनेमुळे स्थानिक प्रशासन अलर्टवर असून, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयटीबीपी यांच्या पथकांनी रात्रीपासून बचावकार्य सुरू केले आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या साहाय्याने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संवाद साधला असून, केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे. “लोकांपर्यंत मदत पोहोचण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही,” असे पंतप्रधानांनी जाहीर केले.
गंगोत्रीच्या मार्गावर असलेल्या हर्षिल आणि भटवाडी भागांना मोठा फटका बसला आहे. १० ते १२ घरे पूर्णपणे वाहून गेली असून, २० हून अधिक हॉटेल्स आणि गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भागातील अनेक पर्यटक आणि स्थानिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी अभिषेक रूहेला यांनी सांगितले की, “मृतांचा आकडा वाढू शकतो. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.” स्थानिक लोकांनीही यामध्ये सहकार्य करत मदतीचा हात पुढे केला आहे.
राज्य सरकारने सर्व यंत्रणांना सतर्क केले असून, हवामान खात्याने पुढील ४८ तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी प्रशासन अधिक सावध झाला आहे.