गणेशोत्सवाच्या दिवसांत प्रत्येक घरामध्ये बाप्पा विराजमान होतात. सहसा आपण डाव्या सोंडेचा गणपती पाहतो, पण उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल मात्र लोकांमध्ये नेहमीच कुतूहल आणि थोडी भीतीही असते. खरंच उजव्या सोंडेचा गणपती कडक मानला जातो का? चला जाणून घेऊया शास्त्र आणि मान्यतानुसार यामागचं खरं रहस्य.
गणपतीच्या सोंडेचा अर्थ
शास्त्रानुसार गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा वेगवेगळ्या स्वरूपांचे प्रतीक मानली जाते –
- उजवीकडे वर वळलेली सोंड – सिद्धिविनायक
- डावीकडे वर वळलेली सोंड – ऋद्धिविनायक
- उजवीकडे खाली वळलेली सोंड – बुद्धिविनायक
- डावीकडे खाली वळलेली सोंड – शक्तीविनायक
यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीला विशेष महत्त्व दिले जाते.
उजव्या सोंडेच्या गणपतीचे वैशिष्ट्य
धार्मिक मान्यतेनुसार उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा अत्यंत शुचिर्भूत आणि तंतोतंत विधीपूर्वक करणे आवश्यक असते. थोडीशी चूक झाली तरी पूजेचे फळ कमी होऊ शकते असे लोक मानतात. म्हणूनच या गणपतीला ‘कडक’ म्हटले जाते.
सिद्धिविनायक गणपती आणि महागणपती
गणपतीचे दोन संकल्पना शास्त्रात सांगितल्या आहेत – गणपती आणि महागणपती.
- माता पार्वतीने तयार केलेला गणपती हा महागणपतीचा अवतार मानला जातो.
- महागणपतीने अनेक अवतार घेऊन दुष्टांचा नाश केला.
- अष्टविनायकांपैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे.
पूजा कशी करावी?
- उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना साधारणतः मोक्षसिद्धी, विशेष सिद्धी किंवा मनोकामना पूर्णतेसाठी केली जाते.
- पूजेवेळी पार्थिव गणपती बनवून षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी लागते.
- पूजा संपल्यानंतर लगेच विसर्जन करणे आवश्यक असते.
भीती नको, भक्ती महत्त्वाची
गणपती हा संकटहारी आणि मंगलमूर्ती आहे. तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो, अमंगल करत नाही. त्यामुळे सोंडेची दिशा कोणतीही असली तरी भक्तीभाव महत्त्वाचा आहे. डोळसपणे, मनापासून केलेली पूजा निश्चितच फलदायी ठरते.