शुभमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम: ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सुनील गावसकर आणि सोबर्स यांनाही टाकले मागे!



नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत खेळताना त्याने एका मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा ४७ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

पहिल्या डावातील लंचपूर्वी केवळ १५ धावा करताच शुभमनने सुनील गावसकर यांचा १९७८-७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७३२ धावांचा विक्रम मागे टाकला. यासह गिल एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींमध्ये शुभमनने एकूण ७३३ धावा केल्या असून, या विक्रमानंतर तो भारतीय कसोटी इतिहासातील सर्वोच्च स्थानावर विराजमान झाला आहे. सुनील गावसकर आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहली याने केलेल्या ६५५, ६१० आणि ५९३ धावा अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

गॅरी सोबर्स यांचाही विक्रम मोडला

या कामगिरीसह शुभमन गिलने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्येही इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या ‘सेना’ देशांमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून त्याने आपले स्थान मजबूत केले आहे.

या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गॅरी सोबर्स यांच्या नावावर होता. त्यांनी १९६६ साली इंग्लंड दौऱ्यात ७२२ धावा केल्या होत्या. आता शुभमनच्या ७३३ धावांनी तो विक्रमही मागे पडला आहे.

नव्या युगाचा प्रारंभ

शुभमन गिलच्या या विक्रमी खेळीने भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये एक नव्या पर्वाची नांदी झाली आहे. त्याचे सातत्य, संयम, आणि नेतृत्वगुण यामुळे तो भारतीय संघासाठी आश्वासक नेतृत्व ठरत आहे. विराट कोहलीच्या यशस्वी कारकिर्दीनंतर गिलच्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींसाठी नवीन आशा निर्माण केली आहे.


Leave a Comment