झारखंडचे शिल्पकार शिबू सोरेन यांचे निधन: देशभरातून शोकाची लाट


झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) संस्थापक, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आदिवासी हक्कांचे बुलंद आवाज असलेले ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांचे निधन झाले. वयाच्या ८१व्या वर्षी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे ते गेल्या दीड महिन्यांपासून उपचार घेत होते.

सोरेन यांच्या निधनानंतर देशभरातून विविध राजकीय, सामाजिक आणि जनतेकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिबू सोरेन यांचे पुत्र, यांनी ‘एक्स’वर भावना व्यक्त करत लिहिले, “आदरणीय दिशोम गुरुजी आम्हाला सोडून गेले… मी आज शून्य झालो आहे.

सोरेन यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तात्काळ स्थगित करण्यात आले आहे. तसेच राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सोमवारी आणि मंगळवारी सरकारी कार्यालये बंद राहतील, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली.

शिबू सोरेन: संघर्षाचे प्रतीक
शिबू सोरेन यांचे संपूर्ण राजकीय जीवन हे आदिवासी अस्मिता, हक्क आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी लढ्याने ओतप्रोत भरलेले होते. त्यांनी गरीब, वंचित, मागास आणि आदिवासी समाजासाठी संघर्ष करत झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली आणि झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “शिबू सोरेन तळागाळातील नेते होते. ते आदिवासी समूह, गरीब आणि रंजल्यागांजल्यांच्या सक्षमीकरणासाठी आग्रही होते.
राहुल गांधी यांनीही श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, “शिबू सोरेन हे आदिवासी समूहांचा मजबूत आवाज होते. त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

सोरेन यांचे पार्थिव सोमवारी संध्याकाळी रांची येथे आणण्यात आले असून रामगढ जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने झारखंड आणि संपूर्ण भारताने एक दृढनिश्चयी, दूरदर्शी आणि तळमळीचा नेता गमावला आहे.


Leave a Comment