सेट परीक्षेचा निकाल रखडल्याने उमेदवार चिंतेत; एसबीसी आरक्षणाबाबत शासनाचा अभिप्राय प्रलंबित



पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET Exam 2025) निकालाची प्रतीक्षा अजूनही वाढली आहे. परीक्षेला जवळपास दोन महिने उलटून गेले तरीही निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे राज्यातील तब्बल १ लाख १० हजार ४१२ उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

निकाल जाहीर करण्यात होणाऱ्या या विलंबामागे विशेष मागास प्रवर्ग (SBC) आरक्षणाबाबतचा निर्णय हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या सेट विभागाने या प्रवर्गाला आरक्षण लागू करायचे की नाही, याबाबत राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. परंतु शासनाकडून अजूनही स्पष्ट अभिप्राय मिळालेला नसल्याने निकाल रखडला आहे.

१५ जून रोजी झाली परीक्षा

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली SET परीक्षा १५ जून २०२५ रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या २० दिवसांत उत्तरतालिका प्रसिद्ध झाली. त्यामुळे उमेदवारांना निकालही तातडीने लागेल अशी अपेक्षा होती.

नेटचा निकाल अवघ्या २२ दिवसांत

याच काळात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET Exam 2025) २५ ते २९ जूनदरम्यान पार पडली. संगणक प्रणालीवर आधारित असल्याने नेटचा निकाल फक्त २२ दिवसांत जाहीर झाला. मात्र, सेटचा निकाल दोन महिने उलटूनही जाहीर न झाल्याने उमेदवारांच्या नाराजीत वाढ झाली आहे.

विद्यापीठाची भूमिका

विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले,
“सेट परीक्षेचा निकाल पूर्णपणे तयार आहे. मात्र, एसबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. शासनाकडून अभिप्राय मिळताच निकाल जाहीर करण्यात येईल. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”

उमेदवारांचा वाढता तणाव

या निकालावर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता अवलंबून असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य या निकालाशी निगडीत आहे. विलंबामुळे त्यांची मानसिकता ढासळत असून, शासनाने तातडीने निर्णय घेऊन निकाल जाहीर करावा, अशी उमेदवारांची मागणी आहे.


Leave a Comment