Sanju Rathod Pillu Song: ‘एक नंबर तुझी कंबर’ आणि ‘गुलाबी साडी’ सारख्या सुपरहिट गाण्यांनंतर गायक संजू राठोड यांचं नवं धमाकेदार गाणं ‘पिल्लू’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जीएमई म्युझिक प्रस्तुत हे गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. आकर्षक बीट्स, धम्माल डान्स आणि ग्रामीण निसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
गाण्यात संजू राठोडसोबत सेजल नायकरे हिची नवी आणि फ्रेश जोडी पाहायला मिळते. या गाण्याचं निर्मिती कार्य श्रीनाथ कोडग आणि चेतन चव्हाण यांनी तर दिग्दर्शन अभिजीत दाणी यांनी केलं आहे. गाण्याचं संगीत जी-स्पार्क यांचं असून गायक म्हणून संजू राठोड आणि मयुरी हरिमकर यांनी गाणं सादर केलं आहे. विशेष म्हणजे गीतलेखन आणि कम्पोझिशन दोन्ही संजू राठोड यांचंच आहे.
संजू राठोड म्हणतात, “‘पिल्लू’ माझ्या मनाच्या खूप जवळचं गाणं आहे. मी स्वतः हे लिहिलं आणि स्वरबद्ध केलं आहे. ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी’ गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, तसंच प्रेम ‘पिल्लू’लाही मिळेल अशी अपेक्षा आहे.“
गाण्याचं शूटिंग नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातल्या दौंडत गावात करण्यात आलं. नयनरम्य निसर्ग, हिरवीगार डोंगररांग आणि गावातील पारंपरिक वातावरण हे या गाण्याचं विशेष आकर्षण ठरले. मात्र, शूटिंगदरम्यान एक थरारक प्रसंग घडला. गावात बिबट्यांचा वावर असल्याने संपूर्ण टीमने काळजीपूर्वक चित्रीकरण केलं. गाण्याच्या दिग्दर्शक अभिजीत दाणी यांनी सांगितले की, “प्रोडक्शन मॅनेजर शहरातून सामान घेऊन येत असताना त्याच्या गाडीसमोर बिबट्या आडवा गेला होता. त्यावेळी आम्ही सगळे हादरलो होतो, पण टीमच्या सहकार्यामुळे शूट पूर्ण होऊ शकलं.“
शूटिंगदरम्यान संजू राठोडला धुळीची अॅलर्जी झाल्यामुळे त्याचे डोळे आणि ओठ सुजले होते. त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि तब्बल पाच तासांनंतर त्याची सूज कमी झाल्यावर शूटिंगचा पहिला टेक घेण्यात आला. गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण खूप आव्हानात्मक असूनही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलं.
‘पिल्लू’ हे गाणं ग्रामीण सौंदर्य, जबरदस्त डान्स मूव्ह्स आणि संजू राठोडच्या हटके आवाजामुळे लवकरच युट्यूब ट्रेण्डिंगमध्ये झळकण्याची शक्यता आहे.