‘पिल्लू’ गाण्याने संजू राठोड पुन्हा चर्चेत – शूटींगवेळी आलेल्या अडचणींपासून ते गाण्याच्या यशापर्यंतचा प्रवास



गायक संजू राठोड पुन्हा एकदा आपल्या खास शैलीतील नवीन गाणं “पिल्लू” घेऊन श्रोत्यांच्या भेटीला आला आहे. ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी’ या गाण्यांनी तरुणाईच्या मनात घर करणाऱ्या संजू राठोडने आता ‘पिल्लू’ या गाण्याद्वारे चाहत्यांना नवा अनुभव दिला आहे. हे गाणं जीएमई म्युझिक प्रस्तुत असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गाण्याची निर्मिती आणि टीम

‘पिल्लू’ गाण्याची निर्मिती श्रीनाथ कोडग आणि चेतन चव्हाण यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा अभिजीत दाणी यांनी सांभाळली आहे. गाण्यात संजू राठोड आणि सोजल नायकरे यांची फ्रेश आणि आकर्षक जोडी पाहायला मिळते. संगीत संयोजन जी-स्फार्क यांचे असून, गायक म्हणून संजू राठोड यांच्यासोबत मयुरी हरमकर यांची साथ लाभली आहे. गाण्याचे गीतलेखनही संजू राठोड यांनी स्वतः केले आहे, ज्यामुळे हे गाणं त्यांच्या मनाला अधिक जवळचं वाटतं.

संजू राठोड यांचे अनुभव

संजू राठोड म्हणाले, “‘पिल्लू’ हे गाणं मी स्वतः लिहिलं आणि कंपोझ केलं आहे. माझ्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी’ या गाण्यांप्रमाणेच प्रेक्षकांनी यालाही तितकंच प्रेम द्यावं, ही विनंती आहे.”

शूटींगमधील थरारक अनुभव

दिग्दर्शक अभिजीत दाणी यांनी सांगितलं की, “गाण्याचे चित्रीकरण नाशिकमधील घोटी येथील डोंगराळ भागात करण्यात आले. त्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचं समजल्याने गावकऱ्यांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता. एक प्रसंग तर असा घडला की, आमचा प्रोडक्शन मॅनेजर बिबट्याला गाडीसमोर पाहून घाबरून गेला. पण संपूर्ण टीमने धैर्य राखून शूट पूर्ण केलं.”

शूटींगवेळी संजू राठोडला झालेली अ‍ॅलर्जी

शूटींगदरम्यान संजू राठोडला धुळीची अ‍ॅलर्जी झाल्याने त्याचे ओठ व डोळे सुजले होते. त्याला त्वरित डॉक्टरकडे नेण्यात आले. तब्बल पाच तासांनंतर सूज कमी झाली आणि फर्स्ट टेकमध्ये गाण्याचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं.


Leave a Comment