सांगली : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत ४ आरोपींना अटक केली असून ७ लाख २० हजार रुपये किंमतीच्या १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सांगलीसह कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटकातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अटक आरोपींची नावे अशी आहेत : सूरज उमेश ओमासे (रा. बेडग), ओंकार तांदळे, योगेश मिरजे आणि वैभव रोमन. ही टोळी मागील काही महिन्यांपासून सांगली, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय होती.
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरज येथे सापळा रचून सूरज ओमासे याला पकडले. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्याच्या साथीदारांचा सहभाग उघडकीस आला आणि त्यांच्याकडून चोरीच्या आणखी मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
तपासादरम्यान मिरज शहर, कुपवाड, तासगाव, शिरोळ, कुरुंदवाड तसेच रायबाग पोलीस ठाण्यांमधील चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर आणि कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सांगली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांना चांगलाच धडा मिळाला असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.