सांगली जिल्ह्यात येत्या गणेशोत्सव (दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर) आणि ईद-ए-मिलाद (5 सप्टेंबर) या सणांदरम्यान होणाऱ्या मिरवणुकांमध्ये प्लाझमा लाईट, बीम लाईट तसेच लेझर बीम लाईटच्या वापरावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक संरक्षण संहिता 2023 च्या कलम 163 (1) नुसार हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार दि. 25 ऑगस्ट सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
प्रशासनाच्या आदेशात नमूद केले आहे की, या प्रकारच्या प्रखर लाईटमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच लहान मुले, जेष्ठ नागरिक व सामान्य नागरिकांच्या डोळ्यांना गंभीर हानी पोहोचू शकते. यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी व आयोजकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगलीत दरवर्षी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग असतो. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आणि अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी लाईट्सवरील बंदी महत्त्वाची ठरणार आहे.