सांगली – कृष्णा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून आज ती 33 फुटांवर पोहोचली आहे. वाढत्या पुरामुळे सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमी परिसर पाण्याखाली गेला असून, येथील सर्व दहनविधी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आता सर्व दहनविधीची प्रक्रिया कुपवाड स्मशानभूमीत पार पाडली जाणार आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक हालचाल टाळण्याचे व अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सांगलीत पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या भागांत पूरस्थिती गंभीर होत आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.