RSS ला हव्या असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थ काय? सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं



मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थ स्पष्ट केला आहे. RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये आयोजित विशेष व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.

भागवत म्हणाले की, संघाचे अंतिम ध्येय भारताला पुन्हा विश्वगुरू बनविण्याचे आहे. “भारताने जगाला योगदान द्यायची वेळ आता आली आहे. गेल्या 100 वर्षांपासून संघ समाजातील सर्व घटकांना संघटित करण्याचे काम करत आहे. हिंदू राष्ट्र म्हणतो म्हणजे कोणालाही वगळणे असा हेतू नाही. याचा अर्थ सर्वांसाठी समान न्याय आणि समान संधी,” असे ते म्हणाले.

सरसंघचालकांनी यावेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि त्यामधील विविध प्रवाहांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, 1857 नंतर भारतीय समाजाने असंतोष व्यक्त करण्यासाठी अनेक मार्ग शोधले. त्यातूनच काँग्रेसचा जन्म झाला, आणि त्या चळवळीमधून अनेक राजकीय प्रवाह बाहेर पडले. पण स्वातंत्र्यानंतर अपेक्षित घडामोडी घडल्या नाहीत.

“देशात एक तिसरी धारा होती – स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वती यांची विचारधारा. त्यांनी समाजाला त्यांच्या मूळ मूल्यांकडे वळवण्याचे आवाहन केले. आज संघ त्या कामाला पुढे नेत आहे,” असे भागवत यांनी स्पष्ट केले.

हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल भागवत पुढे म्हणाले की, “हिंदू राष्ट्र म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा विरोध नाही. जो स्वतःला हिंदू म्हणतो, त्याचे जीवन आदर्श बनवा. मग जे काही कारणास्तव स्वतःला हिंदू मानत नाहीत, ते देखील मान्य करू लागतील. विविधतेत एकता हीच खरी शक्ती आहे.”

RSS च्या शताब्दी वर्षात संघाचे हे संदेश महत्त्वाचे मानले जात आहेत. कारण संघाच्या कार्यपद्धती, विचारसरणी आणि भविष्यातील दिशेविषयीचे संकेत भागवत यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहेत.


Leave a Comment