पुणे :
गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्त्वाचा बदल समोर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सार्वजनिक धर्मादाय संस्थांच्या बँक खात्यांबाबत लागू केलेले नवीन निर्देश १ एप्रिल २०२५ पासून प्रभावी झाले असून, याचा थेट परिणाम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर होणार आहे.
या नव्या नियमांनुसार, फक्त आयकर विभागाकडून मान्यताप्राप्त ‘करमुक्त प्रमाणपत्र’ असलेल्या नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्थांनाच सहकारी बँकांमध्ये बचत खातं ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. करमुक्त प्रमाणपत्र नसलेल्या संस्था, जसे की अनेक गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत नसलेल्या सोसायट्या आणि अपार्टमेंट असोसिएशन्स, यांची बँकेतील बचत खाती आता चालू खात्यांत रूपांतरित केली जाणार आहेत.
या निर्णयाचा मोठा परिणाम असा आहे की बचत खात्यांवर मिळणारे व्याज चालू खात्यांना लागू होत नाही. त्यामुळे मंडळांना त्यांची ठेवी बिनव्याजी ठेवावी लागणार आहेत. शिवाय, चालू खात्यांमध्ये व्यवहार करण्यावर काही मर्यादा आणि अटी देखील लागू होणार आहेत.
उद्यम विकास सहकारी बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या या नवीन धोरणामुळे सार्वजनिक संस्थांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि शिस्तही लागेल. मात्र, अनेक मंडळांना या नियमांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार सध्या अडथळ्यांना सामोरे जात आहेत.
नवीन नियमांची प्रमुख वैशिष्ट्ये:
- फक्त नोंदणीकृत, करमुक्त प्रमाणपत्र असलेल्या संस्थांनाच बचत खाते ठेवता येणार
- अपात्र संस्थांची खाती चालू खात्यांत रूपांतरित केली जातील
- बचत खात्याचे व्याज लाभ बंद
- रक्कम काढण्यावर निर्बंध लागू
- नियमांचा उद्देश – आर्थिक पारदर्शकता व शिस्त
ही नवीन प्रणाली बँकिंग व्यवहारांमध्ये सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न असला तरी, गणेशोत्सव मंडळांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक प्रमाणपत्रे मिळविणे आता अनिवार्य झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार वाढत असतात. अशावेळी बँकिंग व्यवहार अडथळ्यांमुळे अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे मंडळांनी लवकरात लवकर रिझर्व्ह बँकेच्या या नवीन नियमांची माहिती घेतली पाहिजे आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपल्या खात्यांची स्थिती निश्चित केली पाहिजे.