नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडाक्षेत्रातील बदलत्या प्रवाहावर भर दिला. भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासात खेळ हा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांनी नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण हे खेळांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पूर्वी मुले अभ्यासाऐवजी खेळांमध्ये वेळ घालवत असल्यास पालक नाराज व्हायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आज मुले खेळांकडे वळली तर पालकांनाही अभिमान वाटतो. ही सकारात्मक मानसिकता भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे.”
नवीन क्रीडा धोरणामुळे शालेय स्तरापासून ते ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत खेळाडूंना सक्षम पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, तंदुरुस्ती आणि व्यवस्थापनाची सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे देशात क्रीडा क्षेत्रासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण होईल, असा मोदींचा विश्वास आहे.
मोदींच्या भाषणावेळी ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकरसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा विधेयक संसदेत सादर करून व्यवस्थापनात पारदर्शकता, खेळाडू कल्याण आणि जागतिक मानांकनाशी सुसंगतता आणण्याचे पाऊल उचलले आहे. या विधेयकाकडे क्रीडाक्षेत्रात नवा अध्याय म्हणून पाहिले जात आहे.
भारताने २०२१ मधील टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सात पदके जिंकली होती. यामध्ये नीरज चोप्राचे सुवर्णपदक विशेष ठरले. मात्र, भारताला अद्याप १० पदकांचा टप्पा गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मोदींनी आश्वासन दिले की, नवीन धोरणामुळे आगामी काळात हा टप्पा नक्कीच गाठला जाईल. तंदुरुस्ती हा खेळांचा गाभा असून त्यावर भर देणे हे भविष्यातील यशाचे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय क्रीडा धोरणामुळे भारतातील क्रीडाक्षेत्रात दीर्घकालीन बदल घडतील, तसेच देशाच्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या स्वप्नालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.