पुणे – पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम साधत, पुनीत बालन ग्रुपने यंदा डीजेमुक्त दहीहंडी साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील २३ गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, १५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लाल महाल चौक येथे संयुक्त दहीहंडी सोहळा पारंपरिक पद्धतीने रंगणार आहे.
गेल्या वर्षीपासून पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून हा संयुक्त दहीहंडी उपक्रम सुरू करण्यात आला. उद्दिष्ट होते, दहीहंडीमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करणे आणि अनावश्यक ध्वनीप्रदूषण टाळणे. पहिल्याच वर्षी ३५ मंडळांनी सहभाग घेतला होता, तर यंदा २३ मंडळे विशेषतः डीजेविना दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
या सोहळ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती, श्रीमंत पेशवे गणपती मंदिर आणि लक्ष्मी रस्त्यावरील श्री गरुड गणपती यांसारख्या प्रतिष्ठित मंडळांचा सहभाग आहे.
दहीहंडीचा कार्यक्रम पारंपरिक वाद्यांच्या गजरात होणार असून, युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोल-ताशा वादन रंगतदार वातावरण निर्मिती करणार आहे. यानंतर प्रभात बँडचे सुरेल वादन, मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स बँजो बँडची धमाल, तसेच उज्जैन येथील पारंपरिक शिव महाकाल कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले की, “आपल्या सण-उत्सवांचा आनंद घेताना, परंपरा जपत आणि समाजहित लक्षात ठेवून साजरा करणे गरजेचे आहे. डीजेमुक्त दहीहंडी हा त्याच दिशेने टाकलेला पाऊल आहे.”
या निर्णयामुळे केवळ ध्वनीप्रदूषण कमी होणार नाही, तर पुणेकरांना एक अनोखा, पारंपरिक आणि सुरक्षित दहीहंडी सोहळा अनुभवता येणार आहे.